नवी दिल्ली : पूर्व दिल्लीच्या विवेक विहार भागातील एका खासगी बाल रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत सात नवजात बालकांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता बेबी केअर न्यू बॉर्न हॉस्पिटलला आग लागली आणि लगेचच ती शेजारच्या दोन इमारतींत पसरली, असे दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विदर्भातील भंडारा शहरातदेखील तीन वर्षांपूर्वी अशाच एका घटनेत ११ बालकांचा मृत्यू झाला होता.
दिल्ली प्रशासनाने या दुर्घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले असून, पोलिसांनी रुग्णालयाच्या मालकाला अटक केली आहे. रुग्णालयातून १२ नवजात बालकांची सुटका करण्यात आली. तथापि, त्यातील सात जणांचा मृत्यू झाला, असे दिल्ली अग्निशमन सेवेचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले. पाच बाळांवर दुसऱ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यातील काहींना किरकोळ दुखापत झाली आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनचे १६ बंब बोलवावे लागले, असे विभागीय अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल यांनी सांगितले. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.
