Explore

Search

April 13, 2025 10:35 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara : कोयना धरणात पाणीसाठा कमी, तरी जुलैपर्यंत चिंता नाही

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा मे महिनाअखेर कमी झाला असला तरी किमान दि. १५ जुलैपर्यंतही चिंता नसल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील बहुतांशी भागांत पाणीबाणी सुरू असताना राज्यातील तारणहार ठरलेल्या कोयना प्रकल्पाकडे पाणी मागणीचा भार वाढला होता. यादरम्यान कोयना धरणाच्या पायथा वीजगृह व नदी विमोचकातून कोयना नदीपात्रात गेले चार महिने अपवाद वगळता अखंडपणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पूर्वेकडील कोयना, कृष्णा नदीवर अवलंबून असलेल्या भागाची तहान भागली व शेतीला उपयुक्त ठरले.

ऐन दुष्काळजन्य स्थितीत कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे वीजनिर्मितीसह कृष्णा, कोयना नदीकाठ जलसमृद्ध करत दुष्काळ भागांनाही दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कोयना प्रकल्पाकडून झाले आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठा असलेल्या कोयना धरणातील तब्बल ४४.२५ टीएमसी पाणी हे धरणातून पूर्वेकडे सिंचन व पिण्यासाठी सोडण्यात आले आहे. सध्या धरणात २१.९३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून जून महिन्यात जरी पावसाने दडी मारली तरी किमान १५ जुलैपर्यंत पुरेसा पाणीसाठा धरणात आहे.

कोयना धरणातील गत दोन वर्षे कोयना जलविद्युत प्रकल्पाने लवादाच्या मर्यादेपेक्षा अतिरिक्त पाण्याचा वापर वीजनिर्मिती करून राज्याला वीज संकटातून वाचवले होते. चालू वर्षी तांत्रिक वर्ष संपायला पाच दिवस बाकी असताना लवादाने निर्धारित केलेला ६७.५० टीएमसी पाणीसाठ्यापैकी ५४.७६ टीएमसी इतकाच पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी झाला. त्यामुळे चालू तांत्रिक वर्षात वीजनिर्मितीसाठीचा आरक्षित पाणीसाठा संपण्याची शक्यता कमी आहे.

पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग..

कोयना धरणात एकूण पाणीसाठा २१.९३ टीएमसी इतका असून मृतसाठा वगळता उपयुक्त पाणीसाठा १६.८१ टीएमसी आहे. कोयना धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येणारे नदी विमोचक गेट चालू वर्षी दि. २० फेब्रुवारीला सुरू करण्यात आले होते. मार्च महिन्यातील दोन दिवस वगळता सलग सुमारे चार महिने सुरू होते.

रविवारी दुपारी सांगली पाटबंधारे विभागाची सिंचनाची मागणी कमी झाल्याने नदी विमोचकातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने पाठ फिरवल्याने धरणाच्या पायथा वीजगृहातून ऑक्टोबर महिन्यात सुरू केलेला पाण्याचा विसर्ग काही अपवाद वगळता आजवर सुरूच आहे. सध्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy