Explore

Search

April 19, 2026 11:16 pm

लेटेस्ट न्यूज़

Satara/Tarle News : तब्बल 102 गावांचा विरोध असूनही अदानी प्रोजेक्टचे काम सुरू

तारळे : कळंबे (ता. पाटण) येथे होऊ घातलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्टला तारळे विभागातील 102 गावांनी आपला कडाडून विरोध कायम ठेवला आहे; परंतु स्थानिकांचा विरोध डावलून कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केल्याने नागरिकांमधून तीव्र स्वरूपात संताप व्यक्त केला जात आहे. हे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी तारळी अदानी प्रकल्पविरोधी कृती समितीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

निवदेनात म्हटले आहे, की तारळी धरणावर उभारण्यात येत असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट या वीजनिर्मिती प्रकल्पाला संपूर्ण तारळे विभागातील लोकांचा विरोध आहे. विभागातील गावांनी तसे ठरावही केले आहेत. याबाबत कळंबे येथे एमपीसीबी आणि प्रशासनाच्या वतीने यासंदर्भात घेण्यात आलेल्या सुनावणीत एक हजारपेक्षा जास्त हरकती दाखल झाल्या होत्या.

सध्या हा विषय केंद्र शासनस्तरावर प्रलंबित असताना अदानी कंपनीकडून टेस्टिंग आणि खोदकाम चालू केले आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन तारळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी तारळी पंप स्टोअरेज हायड्रो प्रोजेक्टवर अदानी कंपनीने सुरू केलेले काम त्वरित थांबवावे. स्थानिक लोकांच्या भावना तीव्र आहेत, म्हणून प्रशासनाकडून सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय याठिकाणी कोणतेही काम करू नये. सध्या सुरू असलेले काम तातडीने थांबवावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

पाटण तालुका प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार अनंत गुरव, उंब्रज पोलिसांनाही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी देवराज पाटील, अभिजित जाधव, इंद्रजित पाटील, जोतिराम जाधव, हंबीरराव गोडसे, काशिनाथ भंडारे, नानासाहेब पन्हाळकर, बाळासाहेब जाधव, गणेश जाधव, भास्करराव गोरे, सचिन लवंगे, सूरज गोरे, मारुती पवार, विजय यादव, अनिल कांबळे, गणेश जाधव, विश्वनाथ पवार, महिपतराव जाधव आदींसह तारळे खोऱ्यातील गावातील कृती समितीतील पदाधिकारी उपस्थित होते.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy