नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सातारा : मुंबई, पुण्यात पावसानं कहर केलाच आहे, शिवाय ठाणे, कोकण, कोल्हापूर, साताऱ्यासह अनेक भागांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नद्या पात्राबाहेर वाहू लागल्या आहेत. त्यामुळे किनारी राहणाऱ्या नागरिकांचे हाल झालेत. राज्यात जिथं जिथं पाऊस पडतोय तिथं नुकसानाची जवळपास सारखीच परिस्थिती पाहायला मिळतेय. उकाड्यानं हैराण झालेले आपण पावसाची आतुरतेनं वाट पाहत होतो, मात्र आता पाऊस डोईजड वाटू लागलाय.
साताऱ्यात गेल्या 10 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहेत. इथल्या पश्चिम भागातील कण्हेर पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं कण्हेर धरण 81 टक्के भरलंय. गुरूवारी (25 जुलै) दुपारी 12 वाजताच्या सुमारास या धरणाचे चारही दरवाजे 2 फुटांनी उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. 5000 क्युसेक वेगानं धरणाचं पाणी वेण्णा नदीपात्रात सोडण्यात आलं. त्याचबरोबर वीर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याचं कळतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, कण्हेर धरणातून 5000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी या धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा 16 हजार क्युसेक प्रतितास एवढा वेगवान आहे. या पाण्यामुळे वेण्णा नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. सध्या कण्हेर धरणात 8.35 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे, तर परिसरात यंदा आतार्यंत 600 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झालीये.
दरम्यान, सातारा जिल्ह्याला अत्यंत सुरेख अशी नैसर्गिक संपत्ती लाभली आहे. पावसाळ्यात हे निसर्ग आणखी खुलतं. परंतु सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनानं ठिकठिकाणी पर्यटकांसाठी बंदीचे आदेश जारी केले आहेत. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्यानं इथला सर्वात उंच धबधबा असलेला लिंगमळा धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
