सातारा : ‘युनोस्को’ला सादर करण्यात आलेल्या ऐतिहासिक बारा गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दाखल झाल्या आहेत. या बारा किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील ११ तर तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. संग्रहालयातील स्वतंत्र दालनात लवकरच या प्रतिकृती नागरिकांना पाहता येतील, अशी माहिती संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्राला समुद्र किनाऱ्यांपासून गड-किल्ल्यांपर्यंतचा भौगोलिक वारसा मिळाला आहे. या भौगोलिक वारशाने पर्यटनासाठी एक समृद्ध दालन खुले केले आहे. हे पर्यटन अधिक बहरावे, यासाठी राज्यातील काही शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा, याकरिता प्रयत्न सुरू होते. युनेस्कोचे ४६ वे अधिवेशन २१ ते ३१ जुलैदरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानात भरवले गेले. या प्रदर्शनासाठी अखिल महाराष्ट्र गीर्यारोहण महासंघाच्या १५ जणांच्या चमूने किल्ल्यांच्या प्रमाणित प्रतिकृती तयार करून त्या शासनाच्यावतीने युनेस्कोसमोर सादर केल्या.
