संपूर्ण सातारा शहर भगवेमय, एक मराठा लाख मराठा च्या जोरदार घोषणा
सातारा : मराठा आरक्षणासाठी सतत संघर्ष करत असणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे ढोल-ताशांच्या गजरात राजधानी सातार्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. या निमित्ताने बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते शिवतीर्थ व तेथून गांधी मैदान अशी भव्य रॅली (grand rally) हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
पोवई नाक्यावर जरांगे यांची भव्य रॅली रिमझिमत्या पावसात निघाली असता जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणला. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने गेल्या आठ दिवसापासून मनोज जरांगे यांच्या सभा आणि रॅलीसाठी बैठका सुरू होत्या. त्याचे उत्तम नियोजन शनिवारी प्रत्यक्षात दिसून आले. शिवतीर्थ पोवई नाका येथे सकाळपासूनच पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. जरांगे यांचे आगमन सकाळी साडेअकरा बाराच्या दरम्यान होईल, असे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात जरांगे यांचे तीन तास उशिरा दुपारी पावणेतीन वाजता आगमन झाले. बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये त्यांचे उशिरा आगमन झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा मधील सुवासिनींनी त्यांना औक्षण केले. त्यानंतर हजारो समन्वयकांच्या उपस्थितीत त्यांची शांतता सद्भावना रॅली बॉम्बे रेस्टॉरंट पासून शिवतीर्थाकडे रवाना झाली. रिमझिमत्या पावसात पोवई नाक्यावर सुद्धा समन्वयक समितीच्या वतीने जरांगे यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
मनोज जरांगे यांनी शिव तिर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संपूर्ण पोवई नाका मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भरून सर्व कार्यकर्ते भगवी टोपी व उपरणे परिधान करून असल्याने वातावरणात भगवा रंग भरून राहिला होता. यानंतर पोवई नाक्यावरून जरांगे यांची रॅली काढण्यात आली. पुढे समन्वयक समितीचे सदस्य दुचाकी वर आणि त्या पाठोपाठ जरांगे यांची वाहने अशी भव्य रॅली पोवई नाका, शाहू चौक, राजपथावरून तालीम संघ मैदान, कमानी हौद मार्गे, देवी चौक- मोती चौक ते गांधी मैदान काढण्यात आली. ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आल्यामुळे संपूर्ण सातारा शहर भगवेमय झाले होते. मनोज जरांगे यांनी समस्त सातारकरांना हात जोडून विनम्र अभिवादन केले. जरांगे यांच्या रॅलीची सांगता गांधी मैदानावर झाली. गांधी मैदानावर सुद्धा प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनोज जरांगे आणि त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांचा शनिवारी सातार्यात मुक्काम असून रविवारी सकाळी ते पुण्याला रवाना झाले.
