सातारा : सातारा विधानसभा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, आणि विमान तयार करण्यासाठी आणि वाहतुकीसाठी लागणारे स्पेअर पार्ट्स उत्पादित किंवा तयार करण्याचे उद्योग सातारा विधानसभा क्षेत्रात तयार करावेत. अशी मागणी भारतीय जनता पार्टी, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री ना.मुरलीधर मोहोळ यांच्याकडे कराड येथील बैठकीमध्ये केली.
सातारा जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारा महत्त्वाचा जिल्हा असल्यामुळे या ठिकाणची औद्योगिक वसाहत सुद्धा खूपच महत्त्वाची आहे. जर, सातारा विधानसभेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ झाले तर भारतातल्या इतर राज्यातील आणि आंतरराष्ट्रीय उद्योग साताऱ्यात येतील आणि साताऱ्याच्या एमआयडीसीचा तसेच साताऱ्याचा विकास होऊन साताऱ्यातील युवकांना कामगारांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीमध्ये उद्योगांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
त्याचप्रमाणे, सातारा शहर आणि तालुका महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक दर्जाचे शहर आहे. सातारा शहरापासून जवळच युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त दर्जाचे कास पुष्प पठार असून सातारा विधानसभा क्षेत्राला निसर्ग संपत्तीची भरपूर देणगी लाभलेली आहे. या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारत देशातील आणि विदेशातील पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणावर येत असतात. या पर्यटकांना मुंबई किंवा पुणे या ठिकाणी विमानाने येऊन रस्त्याने प्रवास करावा लागतो, त्यामुळे काही पर्यटक टाळाटाळ करतात आणि याच कारणामुळे साताऱ्याच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यास मुकतात. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी विमानतळ महत्वाचे ठरणार आहे.
तसेच, विमान तयार करण्यासाठी आणि वाहतुकीसाठी लागणारे स्पेअर पार्ट्स उत्पादित किंवा तयार करण्याचे उद्योग साताऱ्यात आले तर, त्यामुळे साताऱ्यातील युवकांना रोजगार उपलब्धतेसाठी खूप मोठा हातभार लागणार आहे.
या आणि इतर सर्व विषयांचा विचार करून सातारा विधानसभा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा ग्रामीण पश्चिम मंडल अध्यक्ष महेश गाडे, जावळी मंडल अध्यक्ष श्रीहरी गोळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आणि नगरसेवक धनंजय जांभळे, ऍड प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, धनंजय पाटील, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, नितीन कदम, सातारा ग्रामीण सरचिटणीस वैभव यादव, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, सोशल मीडिया अध्यक्ष कृणाल मोरे उपस्थित होते.
