सातारा : महाराष्ट्राच्या इतिहासातील शिवशाहीचा गौरव व्यक्त करणार्या संमेलनात स्मिता देशमुख (Smita Deshmukh) यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक व उद्योजक अशा विविध क्षेत्रातील कार्याबद्दल राष्ट्रीय शिव सह्याद्री कला साहित्य संमेलनात महाराष्ट्र समाज भूषण हा मानाचा पुरस्कार (Award) देवून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानुषंगाने भारताच्या 78व्या स्वातंत्र्यदिनी देशमुख यांचा सातारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे (Satara NCP) पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम (Amitdada Kadam), वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सागर भोगांवकर (Sagar Bhogaonkar) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्मिता देशमुख या राष्ट्रवादीच्या युवती कॉंग्रेस संघटक, महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ सातारा जिल्ह्याच्या सदस्या, तसेच निर्मिती संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत. त्यांनी आपल्या संस्थेमार्फत अपंग लोकांसाठी मोफत साहित्य वाटप केले आहे. तसेच महिला व मुलींसाठी आरोग्य शिबिरे व कायदेविषयक सल्ला यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आयोजित करून त्यांना सहकार्य केले आहे. समाजातील गरजू अपंग व महिलांसाठी त्यांनी विशेष उपक्रम राबवले आहेत. त्यांनी कशवी उमेश क्लब ची स्थापना करून सर्वसामान्य महिलांना त्यांच्या विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवण्यासाठी येथे वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेनिंग व मार्गदर्शन केले जाते. तसेच डिजिटल मार्केटिंगबाबतही मार्गदर्शन केले जाते. किशोरवयीन मुलींसाठी वेगवेगळे उपक्रम व महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन आणि सबळ पाठिंबा देण्याचे काम स्मिता देशमुख यांनी केले आहे.
सत्काराबाबत बोलताना देशमुख म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या नूतन कार्यालयात मान्यवरांकडून झालेल्या सत्काराने मी भारावून गेले आहे. पुरस्काराच्या अनुषंगाने तेवढ्याच जबाबदार्याही वाढल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढीबाबतही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्मिता देशमुख यांना महाराष्ट्र समाज भूषण गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे, शहर अध्यक्ष बाळासाहेब बाबर, राष्ट्रवादीच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
