फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी; 64 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
सातारा : ट्रॅक्टर चोरी करण्यापूर्वी मार्गाची रेकी करून तो परस्पर लांबवणार्या आंतरजिल्हा टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी चिकाटीने तपास करून पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सात ट्रॅक्टर व एक मोटरसायकल असा 64 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना वाहन चोरीच्या तपासा संदर्भात निर्देशित केले होते. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या पथकाने यासंदर्भात कसोशीने तपास केला. फिर्यादी विजयराजे पांढरे यांचा सहा लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच ते दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी सात या दरम्यान चोरीला गेला होता. अज्ञात चोरट्यांचा कसलाही सुगावा नव्हता. तरीसुद्धा फलटण ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच खबर्यांचे नेटवर्क या माध्यमातून गुन्हेगारांचा सुगावा काढला. संबंधित गुन्हेगार हे ट्रॅक्टर चोरी परिसराची व ट्रॅक्टर पार्किंगच्या जागेची रेकी करत असल्याचे निदर्शनास आले.
सुरज शंकर मदने वय 35 अनिकेत महेश जाधव वय 20 दोघे राहणार खडक वस्ती सगोबाची वाडी पोस्ट पणदरे तालुका बारामती या दोघांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न करून अटक करण्यात आली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी साथीदार राजेंद्र मारुती जाधव वय 30 राहणार ढाकाळे तालुका बारामती जिल्हा पुणे याच्या सहकार्याने सात ट्रॅक्टर व एक मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले. सुरज मदने याने एकूण 18 गुन्ह्यांमध्ये चोरी केल्याचे कबूल केले आहे. फलटण ग्रामीण, पुणे ग्रामीण, तसेच सातारा जिल्हा या तिन्ही ठिकाणी या टोळीने चोरी केल्याचे तपासात पुढे आले आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली शांतीलाल ओंबासे, नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, हनुमान दडस, रशिदा पठाण, वैभव सूर्यवंशी, कल्पेश काशीद यांनी तपासात सहभाग घेतला.
