महाबळेश्वर : महाबळेश्वर व पाचगणी पर्यटकांची हॉट डेस्टिनेशन आहेत. या ठिकाणी लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. मात्र, असे असूनही महाबळेश्वर ते पाचगणी या वर्दळीच्या रस्त्याचे ग्रहण सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. रस्त्याचे काम दर्जाहीन होत असल्याने अपघात वाढू लागले आहे. ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असतानाही बांधकाम विभागाकडून गांधारीची भूमिका घेतली जात आहे. यामुळे पर्यटकांचा ओढा विचारात घेता हे काम दर्जेदार करावे, अशी मागणी होत आहे.
महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही प्रमुख पर्यटनस्थळांकडे येणार्या रस्त्यांची दैना झाली आहे. लाखो पर्यटक इकडे येत असताना खड्ड्यातूनच वाट काढावी लागते. नाताळ हंगामामध्ये ही कामे उरकण्याची घाई ठेकेदाराकडून सुरु आहे. नेहमीच खड्डेयुक्त झालेल्या महाबळेश्वर-पाचगणी या रस्त्याच्या कामाचा दिखावा केला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर बांधकाम विभागाकडून ठेकेदारांकरवी रस्त्यांच्या पॅचवर्कची कामे केली जातात. यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. त्यामुळे रस्ते बनवण्याचा खर्च पाण्यात जातो, अशी परिस्थिती या रस्त्याची झाली आहे. सध्या महाबळेश्वरच्या वेण्णा दर्शन छत्रपती प्रतापसिंह उद्यान ते लिंगमळा रस्त्याचे काम रेटून केले जात आहे. रस्त्याची मलमपट्टी करण्याच्या प्रयत्नात आता अवघ्या पाच सहा दिवसात रस्त्यावरची खडी वर आल्याचे दिसत आहे. आताच छोटे छोटे खड्डे पडण्यास देखील सुरुवात झाली आहे.
या कामामुळे रोज अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रस्त्याची खडी पुन्हा बाहेर आल्याने दुचाकी चालक जखमी होत असून चारच दिवसात पाच ते सहा दुचाकी चालक गंभीर जखमी झाले आहेत. या दर्जाहीन रस्ते कामामुळे लोकांचा जीव टांगणीला लागला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्ते कामाकडे जातीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. केवळ कामे न उरकता काम दर्जेदार करण्यावर भर द्यावा, यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी ठेकेदाराची कानउघडणी करावी, अशी मागणी होत आहे.
Author: rayatdarpan
news



