ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केल्या ४७४ धावा
मेलबर्नच्या मैदानात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिल्या सत्रात स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. स्मिथ आणि पॅट कमिन्स या जोडीनं ६ बाद ३११ धावांवर दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ४७४ धावा केल्या आहेत.
जड्डूनं फोडली स्मिथ-पॅट कमिन्सची शतकी भागीदारी
पहिल्या दिवसाअखेर १११ चेंडूत नाबाद राहिलेल्या स्मिथनं कसोटी कारकिर्दीतील ३४ वे शतक झळकावले. स्मिथनं पॅट कमिन्ससोबत सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी (११२ धावा) करत भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले. उपहारापूर्वी पॅट कमिन्स अर्धशतकाच्या उंबरठ्यावर रवींद्र जडेजाचा शिकार झाला. त्याने ६३ चेंडूत संघाच्या धावसंख्येत ४९ धावांचे योगदान दिले. उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियन संघानं धावफलकावर ७ बाद ४५४ धावा करत सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. स्टीव्ह स्मिथ १३९ धावांवर नाबाद खेळत होता.
लंचनंतर मिचेल स्टार्क पाठोपाठ स्मिथही झाला बाद
पहिलं सत्र गाजवल्यानंतर उपहारानंतर भारतीय संघाकडून जड्डूनं पुन्हा भारतीय संघासाठी एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. मिचेल स्टार्कला त्याने १५ धावांवर चालते केले. आकाश दीपच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथ अनलकी ठरला. पुढे येऊन फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. पण त्याने मारलेला फटका पॅडवर लागून यष्टीकडे गेला अन् तो बोल्ड झाला. स्मिथनं १९७ चेंडूत १४० धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहनं लायनची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४७४ धावांवर खल्लास केला.
