Explore

Search

April 21, 2026 4:58 pm

लेटेस्ट न्यूज़

Khandala News : सैन्यदलात भरती होणार्‍या तरुणास बक्षीस

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील आदर्श व पाणीदार गाव घाडगेवाडी येथील ग्रामपंचायतीने गावातील सैन्यदलात निवड होणार्‍या जवानास 25 हजार 551 रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. भारतीय सैन्यदलातील स्थलसेना, नौसेना, हवाईसेना यापैकी कोणत्याही सेनेत दाखल होणार्‍या गावातील तरुणांसाठी हे बक्षीस जाहीर करणारे हे जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरले आहे. या निर्णयाचे जिल्ह्यात स्वागत व कौतुक करण्यात येत आहे .

घाडगेवाडी गावातील जास्तीत जास्त तरुणांनी देशसेवेसाठी सैन्यदलात भरती व्हावे, गावाचे नाव उज्ज्वल करावे, तरुणांमध्ये देशप्रेम वाढीस लागावे या उद्देशाने ग्रामपंचायतीने ही घोषणा केल्याची माहिती आदर्श सरपंच हिरालाल घाडगे यांनी दिली. कायम पाण्यासाठी वनवास असलेल्या या गावाला हिरालाल घाडगे यांच्या माध्यमातून दमदार सरपंच मिळाल्यानंतर विविध कामे मार्गी लागली आहेत. त्यामध्ये एशियन पेंट ही संस्था त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेच्या सहाय्याने गावात विविध उपक्रमातून आदर्श गाव ही संकल्पना वाढीस लागत आहे.

सन 2013 ते 18 या कालावधीत तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसणार्‍या घाडगेवाडीची विकासात्मक भरारी थक्क करणारी आहे. जिल्हा परिषद, खंडाळा पंचायत समितीचे अधिकारी, एशियन पेंटस, वनराई संस्थेच्या समन्वयातून आहे. डोंगराच्या कुशीत वसलेल्या घाडगेवाडी ग्रामस्थांनी कंबर कसत विकासाला हातभार लावला. सरपंच हिरालाल घाडगे यांनी दूरदृष्टी ठेवत आदर्श गावच्या दिशेनी वाटचाल सुरू केली. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने, अर्चना वाघमळे, विश्वास सिद, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे संजय लाड, विस्तार अधिकारी सुनिल बोडरे, ग्रामअधिकारी यशोदा बनकर यांच्या सहकार्यातून गावात विविध योजना, उपक्रम राबवण्यात आले.

त्यामध्ये स्वच्छता व जलसमृद्धीच्या कामाला विशेष प्राधान्य देण्यात आले. जलतारा प्रकल्प अंतर्गत 430 जलतारे काढून लाखो लिटर पाण्याचे पुनर्भरण केले. जलसाठ्याचे विकेंद्रीकरण, गावातील पाणी गावात – शेतातील पाणी शेतातच मुरवले. माथा ते पायथा असा उपक्रम राबवत लोकसभागातून शाश्वत व ग्रामीण विकास या दृष्टिकोनातून जलसंधारणाची कामे उभारण्यात आली आहेत. वनराई बंधारे शेत बांधबंदिस्ती, अनगड व दगडी बांध, गॅबियन बंधारे, मातीनाला बांध सिमेंटचे नालाबांध छतावरील पाण्याचे संकलन, मातीनाला बांध दुरुस्ती, तृण बिजारोपण, वृक्षारोपण फळझाडे लागवड, दहा हेक्टरवर बांबू लागवड तर जलजीवन मिशनमधून पाणीपुरवठा विहीर व पाण्याची टाकी, पंपिंग मशीन दाबनलिका, वितरण व्यवस्था यासह दोन वर्षात जलसंधारणाच्या कामामुळे पाणी पातळीत 30 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे किमान दोन ते अडीच महिने टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या गावची टॅकरची वर्षाला सव्वा लाख रुपयांची बचत होत आहे.

या गावाने स्वच्छता, जलसंधारण घनकचरा व्यवस्थापन यावर काम केले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत वीज पोहचली नाही अशा ठिकाणी वीज पोहचवून कचरेवस्ती प्रकाशमान केली असून जंगल संरक्षण, विधवा प्रथाबंदी यासह गावाच्या नावलौकीकात भर घालणारे उपक्रम राबवून तरुणांनी नव्याने सैन्यदलात सहभागी होण्यासाठी गावाने 25 हजार 551 रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy