शेअर बाजारात चार दिवसात तेजी पाहायला मिळाली. या तेजीमुळं साडे चार वर्षातील एका आठवड्यात सर्वात मोठी वाढ आहे.
भारतीय शेअर बाजारात ऑक्टोबर २०२४ पासून सुरु असलेली घसरण थांबत असल्याचे संकेत मिळत आहेत. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात पुन्हा खरेदी सुरु केल्यानं आणि कमी किमतीवर शेअर खरेदी मोठ्या प्रमाणावर झाल्यानं शेअर बाजारात तेजी परतली आहे. १७ मार्च ते २१ मार्च या काळात सलग पाच दिवसांमध्ये तेजी पाहायला मिळाली. या पाच दिवसांच्या तेजीनं शेअर बाजाराचं चार वर्षांचं रेकॉर्ड मोडल आहे.
सेन्सेक्स ५५२ अंकांनी वाढून ७६९०० अंकांवर बंद झाला. निफ्टी ५० मध्ये देखील १६० अकांची तेजी पाहायला मिळेल. निफ्टी ५० निर्देशांक २३३५० अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ४.३ टक्क्यांची वाढ झाली. २२ जुलै २०२२ नंतर सेन्सेक्सची एका आठवड्यातील सर्वोत्तम कामगिरी राहिली. निफ्टीमध्ये ५ फेब्रुवारी २०२१ नंतर सर्वोत्तम कामगिरी एका आठवड्यात राहिली. निफ्टी मिडकॅप ७.७ टक्के तर निफ्टी स्मॉलकॅप ८.६ टक्के वाढला.
शेअर बाजारात तेजी असल्यानं मुंबई स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असलेल्या कंपन्यांच्या बाजार मूल्यात वाढ झाली. शुक्रवारी बाजारमूल्य ४.७ लाख कोटींनी वाढलं. या आठवड्यातील पाच दिवसांमध्ये बाजारमूल्य २२ लाख कोटी वाढून ४१३ लाख कोटी झालं आहे.
सेन्सेक्स सध्या उच्चांकापासून ८.८ टक्के खाली आहे. तर, निफ्टी ९.५ टक्के खाली आहे. निफ्टी मिडकॅपमध्ये १३.८ टक्के तर स्मॉल कॅपमध्ये १५ टक्क्यांची घसरण झाली आहे.
विश्लेषकांच्या माहितीनुसार शेअरच्या किमती घसरल्यानंतर कमी किमतीवर स्टॉक खरेदीला गुंतवणूकदारांकडून जोर दिला जात आहे. याशिवाय विदेशी गुंतवणूकदारांनी ३२३९ कोटींच्या शेअरची खरेदी केली. तर, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३१३६ कोटी रुपयांच्या स्टॉक्सची विक्री केली.
अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात दोनवेळा कपातीचा अंदाज वर्तवला आहे. यामुळं गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. डिसेंबर ते मार्च या तिमाहीतील कामगिरी, आरबीआयकडून एप्रिलमध्ये जाहीर होणारं पतधोरण, अमेरिकेचं व्यापार धोरण यावर शेअर बाजारातील भविष्यातील कामगिरी अवलंबून असेल.
अल्फानिती फिनटेकचे सह संस्थापक यूआर भट्टनं म्हटलं की या आठवड्यात शॉर्टवर्किंगमुळं बाजारात तेजी आली आहे. मात्र, बाजारातील मजबुतीसाठी दीर्घकालीन विचार करुन खरेदीची गरज आहे.
