प्रतिनिधी बामणोली
रत्नागिरी जिल्ह्यातील थेट खेडला उतरून थेट कोकणाला सातारा ते कास पठार व पाचवड – मेढा – बामणोली मार्गे जोडणाऱ्या सावरी ते सोनाडी ब्रीजच्या कामाला सुरुवात झाली असून या पुलाचे काम गतीने सुरू आहे. टी ॲंन्ड टी कंपनीच्या माध्यमातून या केबल स्टे वापरून भव्यदिव्य अशा पूलाचे काम सुरू असून यातून पश्चिम महाराष्ट्र व कोकण अगदी जवळून जोडले जाणार आहेत.
या कामासाठी अंदाजपत्रकीय रक्कम रु.254,09,68,625/- (जीएसटी वगळून) खर्च होणार आहे. या पूलाचे 39.33 मीटरचे 3 गाळे, 90 मीटरचे 2 गाळे व 180 मीटरचे 2 गाळे व 12 मीटरचा 1 गाळा असे एकूण 670 मीटर लांबीचा व 7.50 मीटर रूंदीचा वहनमार्ग, वहनमार्गाच्या दोन्ही बाजूस 1.50 मीटर रूंदीचा पादचारी मार्ग, दोन्ही बाजूस 0.500 मीटर रूंदीचे क्रॅश बॅरिअर, दोन्ही बाजूस केबल ॲंकरींगसाठी 1.825 मीटर रूंदी अशी एकूण 16.150 मीटर रूंदीचा केबल स्टे पध्दतीचा अत्याधुनिक पूल, रिटर्न्स तसेच जोडरस्त्यासह करणे प्रस्तावित आहे.
सद्यस्थितीत अबुटमेंट-1 च्या अबुटमेंट एक व दोनचे कॅपचे काम प्रगतीपथावर आहे.
पिअर एक, दोन, तीन, व सातचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामुळे जावळी तालुक्यातील बामणोली, शेंबडी, पावशेवाडी, मुनावळे, तेटली , आपटी व महाबळेश्वर तालुक्यातील विस्थापित झालेल्या दरेतांब, अहिर, गाढवली, पिंपरी इत्यादी गावांसह दुर्गम कांदाटी खोरे व डोंगर माथ्यावरील दुर्गम गावे एकमेकांना जोडली जाणार आहेत. सदरची गावे अतिडोंगराळ व दुर्गम भागात आहेत. तसेच नजीकच्या भागात व्याघ्र प्रकल्पाचा समावेश असल्याने हा भाग वनपर्यटनासाठी ही प्रसिध्द होत आहे. तथापि या भागातील लोकांना वैद्यकीय, शैक्षणिक व बाजारपेठ आदी गोष्टींसाठी सातारा किंवा महाबळेश्वर आदी ठिकाणी जावे लागते. या पुलामुळे ते शक्य होणार आहे.
दैनंदिन गरजांसाठी जलाशयाच्या काठावर असलेल्या बामणोली, मेढा, महाबळेश्वर, सातारा, दरेतांब या गावांशी सातत्याने संपर्क साधावा लागतो. यासाठी सोनाडी, गाढवली, दरेतांब, पिंपरी पर्यंत जाणेसाठी बोटीने प्रवास करावा लागतो. या बाबींचा विचार करून तसेच तापोळा, बामणोली व इतर गावांच्या नैसर्गिक सौंदर्याचा विचार करून सोनाडी ते सावरी दरम्यान पूल झाल्यास पर्यटनाच्या व दळणवळणाच्या दृष्टीने चालना मिळेल. तसेच हा पूल झाल्यास पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग-4 (एशियन हायवे -47) हा पाचवड – मेढा – मुनावळे – शेबंडी – दरेतांब मार्गे पुढे कोकणातील रघुवीर घाटास जोडता येईल. म्हणजेच या पुलामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकण जवळच्या मार्गाने जोडले जातील. त्यामुळे अत्याधुनिक पध्दतीचा उंच पूल असावा याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे सदर काम सुरू झाले. या पुलामुळे जावळी व महाबळेश्वर तालुका जोडला जाणार आहे. सदर पुलामुळे अंतराची बचत होवून जलाशयाच्या दोन्ही बाजूकडील ग्रामस्थांना त्याचा फायदा होणार आहे. वाहतुकीसाठी सद्या प्रचलित असणारा बोटीने प्रवास करणे टाळता येईल व वेळेची बचत होईल. सदर पूलामुळे रस्त्याने दळणवळणाची सोय झाल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी जवळच्या मार्गाने कमी वेळेत थेट संपर्क साधता येईल, या पूलामुळे पर्यटन वाढीस मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तसेच पर्यटकांना जंगलसफारीचा आनंद लुटता येईल. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जलाशयाच्या पलीकडील लोकांना मुलभूत सोई-सुविधा पुरविणे शक्य होईल.
चौकट -.
सद्या या पुलाबरोबरच कोयना जलाशयावर अहिर ते तापोळा, आपटी ते तापोळा या दोन पुलांची कामे ही सुरू असून एकूण चार पूल कोयना जलाशयात होणार आहेत. यामुळे दुर्गम समजल्या जाणाऱ्या तापोळा, कांदाटी, बामणोली खोऱ्यात दळणवळण सुलभ होवून पर्यटन वाढ होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या नवीन महाबळेश्वर, मुनावळे जलपर्यटन प्रकल्प आदींना गती मिळणार आहे.

Author: rayatdarpan
news