शिवसेना-मनसे युतीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; राष्ट्रवादी एकत्रिकरणावरही बोलले.
प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर मिळताना दिसत आहे. या चर्चांना सुरुवात झाली ती राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलेल्या सूचक वक्तव्यामुळे. त्यांच्या विधानानंतर मनसे आणि ठाकरे गटातील युतीबाबत चर्चांना उधाण आले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला होता. अलीकडेच माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी “जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल. आता थेट बातमीच देऊ,” असे म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या (Shiv Sena MNS Alliance ) शक्यतेला आणखी बळ मिळाले आहे. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी शिवसेना-मनसे युतीबाबत विचारले असता ते म्हणाले की, “ठाकरे यांना एकत्रित आणण्याचे काम माध्यमे करत आहेत. राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत. जर आघाडीची ताकद वाढत असेल, तर त्यांना सामील करण्यात काहीच गैर नाही,” असे म्हणत राज ठाकरे यांचे जयंत पाटील यांनी कौतुक केले.
राष्ट्रवादी एकत्रिकरणावरही बोलले केवळ प्रसारमाध्यमांमधून ही चर्चा
तर दोन्ही राष्ट्रवादीचे गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. याबाबत जयंत पाटील यांनी म्हटलं की, “अशा कोणत्याही चर्चा पक्षात सुरु नाहीत. केवळ प्रसारमाध्यमांमधून ही चर्चा पसरवली जात आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
उद्या राष्ट्रवादीचा वर्धापनदिन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन 10 जून रोजी पार पडणार आहे. याबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उद्या पुण्यात वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे. गेल्यावर्षी नगरमध्ये जेव्हा कार्यक्रम झाला, त्यावेळी पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. यंदा हवामान खात्याचा अंदाज पावसाचा नसला तरी कोणताही रिस्क नको म्हणून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या सभागृहात कार्यक्रम होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Author: rayatdarpan
news