मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतले अशी ओळख असलेल्या रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
प्रतिनिधी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाला असून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. वरळीमध्ये झालेल्या जय्यत कार्यक्रमामध्ये रवींद्र चव्हाणांचे नाव जाहीर करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते.
रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. रवींद्र चव्हाण हे भाजपचे नावाने बारावे अध्यक्ष असतील. मात्र ते विरोधकांचे राजकीय तेरावे घालतील, विरोधकांचे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही असं मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले.
रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे नेते अशीही त्यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर ते भाजपचे 12 वे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.

Author: rayatdarpan
news