मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेले मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.
प्रतिनिधी : ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले आहेत. मानखुर्द, चेंबूरमध्ये जरांगेचं भव्य स्वागत करण्यात आलं. शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. दुसरीकडे प्रत्यक्ष आंदोलनस्थळ म्हणजे, आझाद मैदानही हाऊसफुल झालं आहे. आंदोलकांचे लोंढेच्या लोंढे आझाद मैदानावर आदळतायत. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिलीये. त्यामुळे मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
गणेशोत्सव आणि आंदोलन एकाच वेळी सुरू असल्यामुळे, मुंबई पोलिसांसमोर दोन मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मराठा बांधवांच्या आंदोलनामुळे मुंबईमध्ये मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. प्रशासनानेही त्यादृष्टीने तयारी केली असून आझाद मैदानावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. भाविक आणि आंदोलकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करून शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Author: rayatdarpan
news