जेबीजे एज्युकेशन तर्फे पैगंबर जयंतीनिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आला.
सातारा प्रतिनिधी : राजवाडा येथील नगरपालिका शाळा क्रमांक 1,2,11,14 येथे पारंपरिक मिरवणुकीऐवजी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करून हा दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात एकूण 70 शैक्षणिक किट्स विद्यार्थ्यांना देण्यात आले. कुरआन मधील पहिला अवतरीत आदेश “इक़रा” (म्हणजेच “वाचा”) याचा दाखला देत, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच पैगंबर मोहम्मद (स.अ.व.) यांनी सांगितलेले “ज्ञान हे प्रत्येक मुसलमान पुरुष आणि स्त्रीवर बंधनकारक आहे” हे विचार देखील विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले.
या उपक्रमात बोलताना शाळेचे प्राचार्य मस्के सर यांनी संस्थेचे आभार मानत सांगितले की, “इस्लाममधील दानाची खरी परंपरा जेबीजे एज्युकेशन प्रत्यक्षात राबवत आहे. या उपक्रमामुळे गरीब विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने फायदा होईल.”
मुफ्ती ओबेद यांनी कोणताही गाजावाजा न करता मोहम्मद पैगंबर जयंती एका सामाजिक उपक्रमाने केल्याबद्धल जेबीजे एज्युकेशनचे कौतुक केले.
हा उपक्रम जेबीजे एज्युकेशन चे संस्थापक अध्यक्ष जुबेर शेख यांच्या संकल्पनेतून पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या प्रसंगी गुलाब शेख, मुफ्ती ओबेद, मुफ्ती मोहसीन, सादिक बागवान, जुबेर आतार, वसीम बागवान, सोहेल शेख……. इतर मान्यवर आणि शाळेचे शिक्षकवर्ग उपस्थित होते.

Author: rayatdarpan
news